Thursday, March 1, 2007

भूतावळ

पिशी मावशीचे घर

मसणवटीच्या राईमध्ये, पडक्या घुमटीच्या वाटेवर,
भेंडवताच्या डोहापाशी, पिशी मावशीचे आहे घर

पिशी मावशीच्या पायाशी, मनीमांजरी दिसेल काळी,
ती न कधीही खातसे उंदीर, फक्त खातसे सफ़ेद पाली

दिसेल दारावरी पिंजरा, पिंजऱ्यात ना दिसेल राघू,
परंतू त्यातून एक कावळा हसेल ख्याँ ख्याँ आणिक खूँ खूँ

पिशी मावशी म्हणते त्याला, "काकंभडजी भोगा आता,
पुन्हा दक्षिणा मिळण्यासाठी श्राद्धाचेही पुन्हा जेवता !"

आणि मनीला म्हणते कैशी, "या मनूताई कशास वळवळ,
चोरलात ना कंठा मागे ? आता भोगा त्याचे हे फळ."

पिशी मावशी एकलकोंडी, तिच्या घरी ना नोकर चाकर,
मुसळे कांडूनी देती पोहे, जाते दळते पीठ भराभर.

विंदा करंदीकर

1 comment:

Priyabhashini said...

kavitaa chhaanach. sagalyaa sankalit karoon thevalyane aamhaa wachakanchi khoop soy honaar aahe.

dhanyawaad!