Thursday, February 22, 2007

काही आवडलेल्या कविता

मरवा
पुस्तकातली खूण कराया
दिले एकदा पीस पांढरे;
पिसाहूनी सुकुमार काहिसे
देता घेता त्यांत थरारे.
मेजावरचे वजन छानसे
म्हणून दिला नाजूक शिंपला;
देता घेता उमटे काही
मिना तयाचा त्यावर जडला.
असेच काही द्यावे घ्यावे
दिला एकदा ताजा मरवा
देता घेता त्यांत मिसळला
गंध मनातिल त्याहूनी हिरवा
--- इंदिरा संत ---
पत्र लिही पण
पत्र लिही पण नको पाठवू
शाई मधूनी काजळ गहिरे
लिपिरेषांच्या जाळीमधूनी
नको पाठवू हसू लाजरे
चढण लाडकी भुवई मधली
नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तीळ गालिचा
पूर्णविरामाच्या बिंदूतुन
नको पाठवू अक्षरातुनी
शब्दांमधले अधिरे स्पंदन
कागदातुनी नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण
नको पाठवू विज सुवासिक
उलगडणारी घडीघडीतुन
नको पाठवू असे कितिदा
सांगितले मी : हट्टी तू पण
पाठविसी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमध्येच मिळते
पत्रच पुढचे त्यानंतर पण
वाचायाचे राहून जाते.
---इंदिरा संत---

No comments: