भय इथले संपत नाही
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो
तू मला शिकविली गीते
ते झरे चंद्र सजणाचे
ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण
झाडांत पुन्हा उगवाया
त्या वेली नाजुक भोळ्या
वाऱ्याला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेउन
दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा
आयुष्य स्पर्शुनी गेला
सितेच्या वनवासातिल
जणू अंगी राघवशेला
देउळ पलिकडे तरिही
तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळांपाशी
मी उरलासुरला थेंब
संध्येतिल कमळफुलांसम
मी नटलो श्रुंगाराने
देहाच्या भोवती रिंगण
घालती निळाईत राने
स्त्रोत्रांत इंद्रिये अवघि
गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही
चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते
की परतण्याची घाई
मेंदूतून ढळली माझ्या
निष्पर्ण तरूंची राई
भय इथले संपत नाही ...
कवि ग्रेस.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment